स्थैर्य, दि.३: हाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्याच्यासोबत केवळ 5 लोक जाऊ शकतील. दरम्यान राहुल-प्रियंका यांना 35 खासदारांना सोबत घेऊन जायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवेवर अडवले होते.
दरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत.
यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.
पोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते.