
स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : राजकारणात ‘कमबॅक’ कसा करावा, याचा आदर्श वस्तुपाठ जर कोणी ठेवला असेल, तर ते नाव म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे धडाडीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर. लोकसभेतील पराभवानंतर शांत न बसता त्यांनी एकापाठोपाठ एक जे ऐतिहासिक विजय मिळवले आहेत, त्याची थेट पक्षश्रेष्टींनी दखल घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच झंझावाती कामगिरीच्या जोरावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आता थेट राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पराभवातून विजयाची ‘हॅट्रिक’
लोकसभेच्या निकालानंतर रणजितसिंहांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आणि विकासाच्या राजकारणाला गती दिली. या ‘पाणीदार’ नेतृत्वाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावत, फलटणमध्ये सलग ३० वर्षे असलेली प्रस्थापित सत्ता उलथवून लावली आणि सचिन सुधाकर पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवले. हा विजय केवळ सुरुवात होती.
त्यानंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत रणजितसिंहांनी आपल्या नेतृत्वाची पुन्हा चुणूक दाखवली. या निवडणुकीत २७ पैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवत त्यांनी नगरपालिकेत निर्विवाद बहुमत सिद्ध केले. तसेच, लोकनियुक्त नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणत शहराच्या विकासाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वर्चस्व
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही रणजितदादांच्या नेतृत्वाची जादू पाहायला मिळाली. मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेत त्यांच्याकडे केवळ १ जागा होती, मात्र यंदा फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तब्बल ४ जागा जिंकून मोठी मुसंडी मारली आहे. तर फलटण पंचायत समितीमध्ये पूर्वी फक्त २ सदस्य असताना, आता ८ सदस्य निवडून आणत त्यांनी पंचायत समितीत ‘टाय’ (समान) परिस्थिती निर्माण केली आहे.
पक्षश्रेष्ठींकडून ‘राज्यसभे’चे बळ?
रणजितसिंहांनी दाखवलेली ही राजकीय परिपक्वता आणि एकापाठोपाठ मिळवलेले मोठे विजय पाहता, पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामगिरीवर अत्यंत खूश आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी रणजितदादांना राज्यसभा देऊन मोठी ताकद दिली जाण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, राजकीय विश्लेषणात आघाडीवर असलेल्या ‘बोल भिडू’ या प्रसिद्ध यूट्यूब चॅनेलनेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राज्यसभा मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
रणजितसिंहांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यास, त्यांच्या माध्यमातून फलटणच्या विकासाला त्यांच्या स्वप्नाला आणखी मोठे प्रशासकीय आणि राजकीय पाठबळ मिळेल, असा विश्वास जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
