
पस्थैर्य, खटाव, दि. २८ : पुसेगाव, ता. खटावसह परिसरातील हजारो एकरवर लागवड केलेल्या बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा साह्याने बटाटा काढणीची कामे करत आहेत. मात्र या पिकाला अतिपावसाचा फटका बसला असून, उत्पादन कमी निघत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा त्यांच्या अर्थकारणावर देखील गंभीर परिणाम होत असल्याने येथील बळीराजा हताश झाला आहे.
बटाटा लागवडीसाठी पुसेगाव भागाचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने येथील शेतकर्यांनी बटाटा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. अगदी दोन पोत्यांपासून दोनशे पोत्यांपर्यंत बटाटा लागवड करणारे शेतकरी या परिसरात आहेत. बटाटा पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी असा एकूण एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च होतो. या भागातील शेतकर्यांनी अडीच ते तीन महिन्यांपूर्वी बटाटा पिकाची लागवड केली होती. सुरुवातीला पिकास पोषक वातावरण होते. मात्र पीक पोसण्याच्या आणि काढणीच्या महत्त्वाच्या कालावधीत अतिपाऊस झाल्याचा या पिकास फटका बसला असून, उत्पादन कमी प्रमाणात निघत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.