स्थैर्य, औंध, दि.२४: संपूर्ण राज्याला आदर्श ठरणारी हरणाई सहकारी सूतगिरणी सहकार क्षेत्राला दिशादर्शक ठरली असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सहकारी सूतगिरणीच्या भेटीप्रसंगी ना. पाटील बोलत होते. हरणाई सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष व काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, मायणी मेडिकल कॉलेज चे संस्थापक डॉ. एम आर. देशमुख, धामणेरचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर, मायणीचे माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख, सपोनि उत्तम भापकर, जनरल मॅनेजर रमेश भोसले,अजित घाडगे, निलेश घार्गे, आदी प्रमुख मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री ना पाटील म्हणाले , 25 कोटी 61 लाख रुपयांचे कर्ज मुदती पूर्व नियमित परतफेड करणारी विक्रमी उत्पादनासह फायदेशीर रित्या चालविण्यात येणारी हरणाई सहकारी सूतगिरणी राज्यात आदर्शवत ठरली आहे.
13 हजार 728 चाती असलेल्या हरणाई सूतगिरणीचा निसर्गरम्य, स्वच्छ परिसर व उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हा दुष्काळी पट्ट्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प सहकार क्षेत्राला निश्चितच दिशादर्शक ठरला असल्याचा विश्वास व्यक्त करून ना. पाटील यांनी 12000 चाती असणाऱ्या विस्तारित सूतगिरणीच्या कामाची पाहणी केली.
रणजितसिंह देशमुख म्हणाले , हरणाईचा सहप्रकल्प फळबाग लागवड व अडीच एकर क्षेत्रावरील मत्स्य उद्योग प्रकल्प तरूण पीढीला मार्गदर्शक ठरेल.. सूत्रसंचालन सयाजी सुर्वे यांनी केले तर रमेश भोसले यांनी आभार मानले.