राजकीय दिग्गजांची ‘फिल्डिंग’ लागणार! पत्रकार विरुद्ध नेत्यांमध्ये रंगणार ‘सामना’; ७ व ८ जानेवारीला फलटणमध्ये क्रिकेटचा थरार


पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ व ८ जानेवारी रोजी घडसोली मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत ‘राजकीय नेते विरुद्ध ज्येष्ठ पत्रकार’ यांच्यातील सामना प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ जानेवारी : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटच्या रणांगणात उत्साह ओसंडून वाहणार आहे. माजी आमदार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. ७ व ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. फलटण येथील माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान) येथे हा क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्पर्धेच्या उद्घाटनानंतर होणारा ‘राजकीय नेते विरुद्ध ज्येष्ठ पत्रकार’ हा प्रेक्षणीय सामना! एरवी एकमेकांच्या विरोधात राजकीय आखाड्यात लढणारे तालुक्यातील अनेक राजकीय दिग्गज नेते या सामन्यात एकाच टीममध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे नेत्यांची बॅटिंग आणि पत्रकारांची बॉलिंग पाहण्यासाठी, तसेच या दोन क्षेत्रांतील मान्यवरांची मैदानावरची जुगलबंदी अनुभवण्यासाठी फलटणकरांना मोठी संधी मिळणार आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग

केवळ निमंत्रित संघांनाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अत्यंत उत्साही आणि खेळकर वातावरणात पार पडणाऱ्या या स्पर्धेत यंदाही तोच जोश कायम राहणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडणार असून, त्यानंतर लगेचच पत्रकार आणि राजकीय नेते यांच्यातील प्रदर्शनीय सामना खेळवला जाईल. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघांमध्ये नियमानुसार सामने होतील.

फलटण शहर व तालुक्यातील तमाम क्रिकेट प्रेमींनी आणि नागरिकांनी ७ व ८ जानेवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व फलटण शहर-तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!