
दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फलटण तालुक्यातील आसू येथील एकाला गंभीर दुखापत करुन त्याचा खून करणाऱ्या युवकास सहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. अमोल सुतार असे शिक्षा झालेल्याचे नाव असून या खटल्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या कोर्टात झाली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अमोल रामचंद्र सुतारा (राऊत) आणि त्याचे चुलते हणमंत सुतार या दोघांच्यात आसू येथील एका शेतातील विहिरीच्या कारणावरुन वाद व जुने भांडण होते. याचा राग मनात धरुन अमोल याने हणमंत यांना मारहाण व शिवीगाळ करत त्यांच्या डाव्या छातीच्या खाली चाकूने भोसकून गंभीर दुखापत करुन खून केला होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अमोल सुतार (वय २८, आसू, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख यांनी केला होता. त्यांनी अमोल याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याची सुनावणी सुरु झाल्यानंतर बारा साक्षीदार तपासण्यात आले.
जिल्हा सरकारी वकील एल.के. खाडे यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य करत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेली साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अमोल याला सहा वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, कॉ. मुस्ताक शेख, पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, पोलीस अंमलदार उर्मिला घारगे, शमशुद्दीन शेख, हवालदार सुधीर खुडे, हवालदार गजानन फरांदे, पोलीस नाईक रिहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.