दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील ठाकूरकी येथील यशंवत बाबू जाधव यांचे घर दारूच्या नशेत पेटवून देणाऱ्या एकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरी व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अंकुश लालासाहेब चव्हाण (रा. ठाकूरकी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आरोपी अंकुश चव्हाण हा कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतानच जुलै २0२0 मध्ये तो संचित रजेवर बाहेर आला होता. याचदरम्यान, दि. २७ जुलै २0२0 रोजी तो दारूच्या नशेत दंगा करतच ठाकूरकी येथील यशवंत जाधव यांच्या घरी गेला आणि ‘हणमंत बोडरे याला माझ्यासमक्ष बोलवून आण,’ असे तो यशवंत यांना म्हटला. मात्र, त्यांनी बोडरे यांना बोलाविण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अंकुश चव्हाण याने रागाच्या भरातच जाधव यांचे कुडाचे घर पेटवून दिले. यात त्यांच्या घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अंकुश याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी केल्यानंतर न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी समोर आलेले पुरावे व सरकारी वकील महेश शिंदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी अंकुश चव्हाण याला चार वर्ष सक्तमजुरी व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, आरोपीकडून वसूल केलेला दंड हा तक्रारदार जाधव यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
या खटल्यात पोलिस निरीक्षक एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उर्मिला घार्गे, हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अमित भरते, अश्विनी घोरपडे यांनी कामकाज पाहिले.