स्थैर्य, सातारा, दि. ३: काेराेनामुळे सध्या खेळाडूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशातच चेन्नई सुपरकिंग्जचे १३ खेळाडू बाधित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशा संकटात सुरेश रैनानेही माघार घेतली. या गंभीर परिस्थितीत गाेलंदाज हरभजनसिंगचा लीगमधील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. त्याने अद्याप याबाबत अधिकृत घाेषणा केली नाही. ताे यूएईला रवाना झाला नाही. ताे यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. चेन्नईचा ऑस्ट्रेलियन गाेलंदाज हेझलवुडही सहभागाच्या विचाराने अडचणीत सापडला.
फ्रँचायझीची ४६ काेटींच्या भरपाईची मागणी; बीसीसीआयचा कमाईचा सल्ला
येत्या १९ सप्टेंबरपासून यंदा १३ व्या सत्राच्या टी-२० इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) सुरुवात हाेत आहे. या लीगचे सामने यंदा यूएईमध्ये आयाेजित करण्यात आले. काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन सध्या लीगच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला. याशिवाय प्रायाेजकांकडून मिळणाऱ्या रकमेतही यंदा माेठी कपात झाली आहे. त्यामुळे एकूणच बीसीसीआसह आता आयपीएल फ्रँचायझींवरही आर्थिक संकट आेढवले आहे. यासाठी सर्वच फ्रँचायझीनी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आर्थिक माेबदल्याची मागणी केली. आर्थिक अडचणीमुळे आम्हाला ४६ काेटी रुपये भरपाईच्या स्वरूपात देण्यात यावेत, अशी मागणी फ्रँचायझीनी केली. मात्र, या सर्व मागण्या आधीच अडचणीत असलेल्या बीसीसीआयने धुडकावून लावल्या. आपण अशा प्रकारची काेणतीही भरपाई रक्कम देणार नाही, अशा शब्दांत स्पष्टाेक्ती केली.