दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । सातारा । ल्हासुर्णे, ता. सातारा येथील माधुरी तानाजी सावंत या महिलेस व तिच्या कुटुंबास गावातीलच दशरथ सावंत, जयचंद्र सावंत संभाजी सुतार, आण्णा संभाजी सुतार, हे वारंवार त्रास देत आहेत. याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली तरी पोलिस दबावाखाली संबंधितांवर काहीच हालचाल करत नाहीत. त्यामुळे पोलिस अधीक्षक यांनीच याप्रकरणी लक्ष घालून त्रास देणार्यांचा बंदोबस्त करावा तसेच संशयितांना पाठीशी घालणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित माधुरी सावंत यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित महिलेच्या कुटुंबाची ल्हासुर्णे येथे 40 गुंठे जागा आहे. याठिकाणी शेतघर व शेड आहे. दि. 18 एप्रिल रोजी रात्री शेतात त्यांचा पती व मुलगा काम करत असताना संभाजी बबन सुतार याने तेथे येवून दोघांना शिवीगाळ केली. तसेच महिलेसही हाताला धरून ओढून बाहेर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर मोबाईलवर फोन करून या कुंटुबाला जीवे मारण्याची दशरथ सावंत व इतरांनी धमकी दिली. याबाबतची तक्रार देण्यासाठी महिला कोरेगाव पोलिस ठाण्यात गेली असता तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे महिलेच्या पतीने दि. 20 एप्रिल रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्याच्या प्रती पोलीस अधीक्षकांना पाठवल्या. त्यानंतर दि. 21 रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर एका कागदावर सही घेतली मात्र त्यावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवला नाही. कागदावरची घटनेची वेळ चुकीची नमूद केली असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.
पोलिस या कुटुंबावर दबाव आणत आहेत. महिलेचे फोटो काढणे, तिला पाहून चित्रविचित्र आवाज काढणे असे प्रकार संबधित इसम करू लागले आहेत. महिलेचा पती कर्करोगाने त्रस्त आहे. त्यातच दशरथ सावंत, जयचंद्र सावंत, संभाजी सुतार आणि त्यांचा मुलगा हे संगनमताने त्रास देत असून पोलिस अधीक्षकांनी त्यांचा बंदोबस्त करावा, असे अर्जात म्हटले आहे.