दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | फलटण |
माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेस मारहाण, शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिथिल सुरेश ढोकरट, सुरेश आत्माराम ढोकरट, करुणा सुरेश ढोकरट, ईशान सुरेश ढोकरट, रोहित सुरेश ढोकरट, आकाश सुरेश ढोकरेट, सारिका ईशान ढोकरट, माऊली मनोज ढोकरट व मनोज आत्माराम ढोकरट (सर्व राहणार तोफखाना बाजारपेठ, छावणी, तालुका-जिल्हा औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी, सोमंथळी (ता. फलटण) हे माहेर असणार्या सौ. निकिता मिथिल ढोकरट (वय २२) यांचा विवाह मिथिल सुरेश ढोकरट (रा. तोफखाना बाजारपेठ, छावणी, ता.जि. औरंगाबाद) याच्याशी झाला आहे. दि.२ नोव्हेंबर २०२२ पासून पती मिथिल दारू पिऊन व सासरचे अन्य वरील आरोपी सौ. निकिता यांना माहेरहून जागरण व गोंधळाच्या कार्यक्रमासाठी दीड लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, शारीरिक व मानसिक जाचहाट करीत होते. त्यामुळे या जाचहाटास कंटाळून सौ. निकिता ढोकरट यांनी १ जून २०२३ रोजी सासरच्या वरील सर्व आरोपींवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत.