दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । पुणे । आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवी पर्वानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक भारतीयाच्या मनामनात वसलेला आपली आन बान और शान असलेला तिरंगा राष्ट्रध्वज घरोघरी फडकविला जात आहे, हे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियान म्हणून राबविले जात आहे.
या अभियानांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे 50 लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार आहे. पुणे विभागाच्या दृष्टीने ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या पिढीने, ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुध्द लढा दिला आणि आपला देश पारतंत्र्यातून मुक्त केला. त्या सर्वांनी केलेल्या कामाची जाणीव पुढील पिढीला व्हावी यासाठी हर घर तिरंगा – घरोघरी तिरंगा हा राष्ट्रभक्तीवर उपक्रम देशात सर्वत्र राबविला जात आहे. यात पुणे विभागही मोठ्या अभिमानाने सहभागी होत आहे.
50 लाख घरांवर तिरंगा
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर हे पाच जिल्हे आहेत. या पाचही जिल्ह्यात मिळून जवळपास 50 लाख घरांवर दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपला राष्ट्रध्वज तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकणार आहे. यासाठी शासन, प्रशासन आणि त्यासोबतच समस्त नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. पुणे विभागाच्या ग्रामीण क्षेत्राचा विचार केला असता यात ग्रामीण भागातून जवळपास 30 तर शहरी भागातून 20 लाख असे एकूण 50 लाख राष्ट्रध्वज घरोघरी फडकणार आहेत. अगदी यात पुणे जिल्ह्यात 21 लाख, सातारा जिल्हा 7 लाख 50 हजार, सांगली जिल्हा 6 लाख, सोलापूर जिल्हा 6 लाख तर कोल्हापूर जिल्हा 9 लाख 50 हजार असे एकूण 50 लाख राष्ट्रध्वज जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिले आहेत.
जनजागृती आणि तिरंगा दूत
अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाबाबत देशात सर्वत्र विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्येही तिरंग्याबद्दल राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी ‘ हर घर तिरंगा ’ या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून 8 वीच्या पुढील विद्यार्थ्यांना तिरंगादूत म्हणून प्रशिक्षण दिले आहे. राष्ट्रध्वज फडकवण्यासंदर्भात त्यांच्यामार्फत जनजागृती करणे त्याचप्रमाणे कुटूंबियांपर्यंत भारतीय ध्वजसंहितेचे नियम पोहोचविण्यात येत आहेत.
हर घर तिरंगा संदर्भात सर्वच प्रचलित प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. प्रामुख्याने सायकल रॅली, प्रभातफेरी, दिंडी, पथनाटय्, देशभक्तीपर लघुपट, चित्ररथ शाळांशाळांमधून चित्रकला, वक्तृत्वकला, निबंध, रांगोळी आदी स्पर्धा, व्याख्यानमाला, गावात, शहरात दर्शनी भागात मोठमोठी पोस्टर्स अगदी घंटागाडीमधून जिंगल्सद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. चित्रपटागृहातुन चित्रफीत व जिंगल्स दाखवुन रेडिओ, स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक केबल, एनजीओ, समाजमाध्यमाद्वारे प्रचार करुन राष्ट्रप्रेम, तिरंगा संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
सहज आणि सुलभतेने राष्ट्रध्वज प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रशासन कार्यरत व जागृत आहे. विभागात सर्वत्र जिल्हा परिषद सीएसआरच्या माध्यमातून पेट्रोलपंपधारक, रेशन दुकानदार, बँका, शासकीय कंत्राटदार, स्वयंसेवी संस्था, कर्मचारी संघटना, कर्मचारी पतसंस्था, बचतगट, सहकारी संस्था, सहकारी दूध संघ इत्यादी मार्फत देणगी स्वरुपात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांना वॉर्डनिहाय जबाबदारी देऊन नागरिकांमध्ये प्रचार प्रसिध्दी करुन प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवला जाईल याची काळजी घेण्यात येत आहे.
ध्वजसंहितेचे पालन
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आपण अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकविणार आहोत. पण हे करत असताना आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकरिता ध्वजसंहितेचे पालन आवश्यक आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा. राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजुने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजुने राहील याप्रमाणे फडकवावा. राष्ट्रध्वज उतरवतांना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना पुढील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. प्लास्टिक किंवा कागदी ध्वज वापरु नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत. राष्ट्रध्वज फडकवितेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेऊ नयेत. राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये. राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये. तसेच तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करु नये.
पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एका ठिकाणी तरी 75 फूट झेंडा फडकविला जाण्याचे नियोजन आहे. यात पुणे शहरात शनिवार वाडा व शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राऊंडमध्ये हा झेंडा फडकविला जाईल. हे विभागाचे आगळेवेगळे वैशिष्टय राहणार आहे. या उपक्रमात आपण सर्वांनीही सहभाग घेऊन आपला राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवूया आणि म्हणू या ‘ विजयी विश्व तिरंगा प्यारा… झेंडा ऊंचा रहे हमारा ’… हर घर तिरंगा- हमारी शान तिरंगा
– डॉ. राजू पाटोदकर,
उपसंचालक ( माहिती)
पुणे विभाग, पुणे