
स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : ‘हर घर तिरंगा २०२५’ या उपक्रमांतर्गत फलटण प्रशासनाच्या वतीने मंगळवारी शहरात आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीस हजारो नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
रॅलीच्या प्रारंभी उपस्थितांनी संविधान दक्षतेची शपथ घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तहसीलदार कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली महात्मा फुले चौक, गजानन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गांवरून फिरून पुन्हा तहसीलदार कार्यालय येथे समाप्त झाली.
देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रबळ व्हावी, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून ही रॅली आयोजित करण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आभार मानले.

