उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्थैर्य, मुंबई, दि. ३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, उत्साह घेऊन घेईल. रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल. भाऊ-बहिणीचं पवित्र नातं साजरं करीत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

रक्षाबंधनाचा हा सण भावांनी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करण्याचा, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचा असला तरी, आज कोरोना संकटकाळात आपल्या अनेक महिला डॉक्टर भगिनी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलिस, इतर महिला कर्मचारी असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील  इतर भावांचं कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लढत आहे. या समस्त भगिनीशक्तीच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहण्याची गरज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील समस्त भगिनीशक्तीचा गौरव केला आहे. 

उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला, विशेषत: कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समुद्राच्या लाटांशी वर्षभर खेळत, उसळणाऱ्या लाटांचं आव्हान झेलत सागराशी नातं सांगणारे आमचे कोळी बांधव जोखीम पत्करुन समुद्रात जात असतात. त्यांचं सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण कर. सागरावर अवलंबून असलेल्या आमच्या कोळी बांधवांच्या जीवनात भरभराट येऊ दे, त्यांच्या संसारात आनंद निर्माण कर, असं गाऱ्हाणं उपमुख्यमंत्र्यांनी नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्रराजाला घातलं आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी करताना कोरोना सोशल डिस्टन्सिनंगचे तसेच कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!