नूतनवर्षाभिनंदन – जीभेवर ताबा जगावर कब्जा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेवढा वृध्द होवो देहावर सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहतो ! जीभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे.

मुख म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते. कुणाला ती घायाळ करते, तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते. तिच्यातून अमृत झरते. तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.

जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात. अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर ताबा (खाण्याच्या बाबतीत ही) मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात.

आपलाच जीव्हायात्री ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!