दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२१ | मुंबई |उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईनं अंध:कार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमय होवो. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा, सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येवो. दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया. कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी दिवाळी साजरी करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.