मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा “संविधान दिन” आणखी औचित्यपूर्ण, विशेष महत्त्वाचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना ‘नागरिक’ केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अधिकार-हक्काला, हिताला संविधानात सर्वोच्च स्थान देण्यासाठी आपले ज्ञान, विद्वत्ता पणाला लावण्याचे अपूर्व योगदान देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकारांना या निमित्ताने मानवंदना देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र सुपुत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीच्या सदस्यांना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे संदेशात म्हणतात, भारतीय संविधान जगात मार्गदर्शक असे मानले जाते. संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाच, त्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यातून राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अखंड जागर करणारे हे संविधान भारतीय नागरिकांनी आजच्या दिवशी स्वतः ला समर्पित केले आहे. त्याच आधारावर आपली आतापर्यंतची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली आहे, ती आणखी लोकाभिमुख व्हावी. विकासाचे प्रत्येक पाऊल, योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी यासाठी आपण कटीबद्ध होऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, त्याची अमृत फळं सर्वच जनमानसाला चाखायला मिळावित यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया. त्यांचा अंगिकार करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!