
दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । महाराष्ट्रातील वसई भागात राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत हत्या करण्यात आली. तिच्या शरीराची केलेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीचा तपास केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
चाकणकर यांनी म्हटलं की, महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निर्घुण झालेली हत्या आणि त्यानंतर तिच्या शरिराची झालेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवलं. पण यामध्ये खरं आव्हान आहे ते या घटनेतील ठोस पुरावे आणि आरोपीविरोधात सशक्त दोषारोपपत्र सादर करण्याचे. याबाबत राज्य महिला आयोगानं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्राद्वारे कळवलं आहे.
यामध्ये या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा असं या पत्रात नमूद केलेलं आहे. या घटनेबाबत राज्य महिला आयोग सातत्यानं पाठपुरावा करेल असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.