हणमंतराव सोनवलकर बेस्ट पोलीस पाटील ऑफ द नोव्हेंबर पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत उत्तम काम केल्याबद्दल पोलीस हवालदार अमोल शिवाजी करणे आणि पोलीस पाटील हणमंतराव धुळाजी सोनवलकर यांना अनुक्रमे बेस्ट पोलीस ऑफ द नोव्हेंबर आणि बेस्ट पोलीस पाटील ऑफ द नोव्हेंबर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत उत्कृष्ट काम करणारे पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांना दरमहा सन्मानित करण्यात येते, त्यांच्या महिना भरातील कामकाजाचा आढावा सर्वांसमोर ठेवून इतरांना त्यातून प्रोत्साहन, प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने त्यांचे कामकाजातील महत्वाचे मुद्दे सर्वांसमोर ठेवून त्यांना सन्मानित करण्यात येते.

नोव्हेंबर महिन्यात दुधेबावी येथील पोलीस पाटील हणमंतराव धुळाजी सोनवलकर यांनी या महिनाभरात ४ अपघातग्रस्तांना वेळेत मदत पोहोचविली त्याचप्रमाणे घरगुती प्रकरणात स्वतःला जमिनीत पुरुन घेतलेल्या तरुणाचे मन परिवर्तन करुन त्याचा जीव वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न, वीज ट्रान्सफर्म चोरी प्रकरणी गावात योग्यप्रकारे जनजागृती करुन चोऱ्यांवर निर्बंध आणल्याबद्दल हणमंतराव सोनवलकर पाटील यांना बेस्ट पोलीस पाटील ऑफ द नोव्हेंबर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हणमंतराव सोनवलकर पाटील यांनी पोलीस पाटील संघटनेचे काम उत्तमप्रकारे केले असल्याने त्यांना संघटनेच्या प. महाराष्ट्र उपाध्यक्षपदी कामाची संधी देण्यात आली आहे. पोलीस पाटलांच्या विविध मागण्या शासनस्तरावर मांडण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत.

विशेषतः महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांच्या दालनात महसूल व गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक लावून संघटनेचे राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांना त्यांचे प्रामुख्याने मानधन वाढ, दरवर्षी रिन्युअल, तालुकास्तरावर पोलीस पाटील भवन आदी प्रश्नांची व्यवस्थित मांडणी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

अमोल करणे व हणमंतराव सोनवलकर यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल दोघा कर्मचाऱ्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!