
स्थैर्य, उपळवे, दि. १६ ऑगस्ट : उपळवे (ता. फलटण) या मूळ महसुली गावाच्या वाडी विभाजनाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे, जाधवनगर, सावंतवाडी आणि दऱ्याचीवाडी या पूर्वीच्या वाड्यांना आता स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यांचे स्वतंत्र सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत.
या तिन्ही वाड्यांना सन २००२ मध्ये स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा आणि सन २००४ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायती मिळाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष वाडी विभाजनाची प्रक्रिया महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आजवर या चारही गावांचा महसुली कारभार ‘मौजे उपळवे’ याच नावाने सुरू होता.
ही प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून पूर्ण झाल्याने, गेल्या महिन्याभरापासून या गावांमधील जमिनीच्या हस्तांतरणावर लावण्यात आलेले निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. नागरिकांनी आपला नवीन गट नंबर जाणून घेण्यासाठी उपळवे येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार सचिन पाटील, चारही गावांतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे सहकार्य लाभल्याचे तालुका प्रशासनाने म्हटले आहे.