
स्थैर्य, 24 मार्च, सातारा : चैत्र यात्रा उत्सवानिमित्तशिखर शिंगणापूर मंदिरात देवाचा पाडव्याची गुढी उभारून यात्रेस प्रारंभ झाला. आज पहाटेपासूनच भक्तांचीगर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि ’हर हर महादेव’च्या जयघोषात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. श्री शंभू महादेवाच्या पारंपरिक हळदी सोहळा उत्साहात झाला.
मंदिरातील पुजार्यांच्या सायंकाळी सहा वाजता देवाला हळदी लावण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी बडवे जंगम (कावडे) घडशी, साळी, माळी, दांगट, मोरे, कोळी, छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिनिधी, खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी, शंभू महादेवचे व्यवस्थापन मंदार पत्की यांच्या हस्ते शंभू महादेवाच्या पिंडीवर हळद लावून विधिवत पूजा करण्यात आली.
महादेवाच्या विवाहाच्या निमित्ताने हा हळदी कार्यक्रम दर वर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. महिला भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ओव्या आणि भजनांनी वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण मंदिर परिसर हर हरमहादेवाच्या गर्जनाने दुमदुमून गेला होता. यात्रा समिती आणि ग्रामस्थांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था केली होती, तसेच स्वच्छतेवर विशेष भर देत प्लॅस्टिक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. या हळदीसोहळ्यामुळे संपूर्ण शिखर शिंगणापूर परिसर भक्तीच्या रंगात रंगून गेला असून, गुरुवारी अष्टमीला शंभू महादेवाचा विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी परिसरातील, तसेच राज्यभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
