
स्थैर्य, शिरवळ, दि. २० सप्टेंबर : शिरवळ पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ आणि खंडाळा तालुका परिसरात दरोडा, जबरी चोरी, मारामारी आणि महिलांचा विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी हा आदेश दिला.
या कारवाईमध्ये टोळी प्रमुख प्रकाश अशोक जाधव (वय ३१, रा. तानाजी चौक, शिरवळ) याच्यासह टोळी सदस्य मयुर अशोक जाधव (वय २१, रा. तानाजी चौक, शिरवळ), किरपालसिंग शितलसिंग दुधानी (वय ३७, रा. लोणावळा, जि. पुणे), विशाल महादेव जाधव (वय २८, रा. सटवाई कॉलनी, शिरवळ), सोन्या उर्फ विकास संजय पवार (वय २९, रा. सटवाई कॉलनी, शिरवळ) आणि सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव (वय ४०, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा समावेश आहे.
या टोळीवर दारोडा टाकणे, चोरी करणे, गर्दी मारामारी करून दुखापत पोहोचवणे आणि महिलांबाबतचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या टोळीवर कायद्याचा वचक रहावा, यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत होती.
या पार्श्वभूमीवर, शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलवडे यांनी या टोळीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बी. वाय. भालचिम यांनी केली होती. अखेर पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी होऊन या संपूर्ण टोळीला सातारा आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला