दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । सातारा । महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत किराणामाल दुकानातून वाईन विक्रीस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयावर प्रचंड टीका होवू लागली आहे. व्यसनमुक्ती चळवळीत अग्रेसरपणे काम करणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर महाराजांनी देखील सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे शासनाच्या या ऐतिहासिक, क्रांतीकारी निर्णयाचे जनतेने सडा, रांगोळी काढून, फटाके फोडून स्वागत करावे, असे उपरोधिक आवाहन करत खासदार शरद पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राज्य शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रत्येक सुपर मार्केट व किराणामाल दुकानातून वाईन उपलब्ध करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत धाडसी असा आहे. त्यामुळे आता वाईन घेण्यासाठी जनतेला उगाच भटकंती करावी लागणार नाही. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे शहेनशहा शरदजी पवार या तिघांचे हार्दिक अभिनंदन करतो, असे सांगत हभप बंडातात्या कराडकर पुढे म्हणतात, आपण तिघांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एक धाडसी पाऊल उचलून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो सर्वसामान्य माणसांच्या कल्याणाचा आहे.
आतापर्यंत सामान्य माणसाला दारुच्या, बिअरबारच्या दुकानात असं जावं लागत होतं. शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य माणसाला दारुसाठी येथून पुढे दारुच्या दुकानात जावं लागणार नाही. अगदी किराणामालाच्या दुकानात त्याला दारु उपलब्ध होईल. त्यामुळे माणसांना व्यसन लागण्यासाठी आणि दारुचे दुष्परिणाम त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर होण्यास चांगली मदत होईल, असे हभप बंडातात्या कराडकर यांनी सांगत जहरी टीका केली आहे.