
दैनिक स्थैर्य । 11 जुलै 2025 । फलटण । गुणवरे येथील ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मेडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा व पालक पाय-पूजन सोहळा पारंपरिक उत्साहात झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुजन व पालकांच्या चरणी पुष्प अर्पण करून त्यांच्या ऋणाची आठवण ठेवली.
कार्यक्रमाची सुरुवात व्यास ऋषींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. दीप प्रज्वलन व फोटो पूजन हे माता पालक यांच्यातर्फे करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी गुरुचरित्रावर आधारित भाषणे सादर करत गुरूंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान अमूल्य आहे याविषयीचे प्रकट केले. यामध्ये शौर्य गाढवे (2 री), अनुराधा गाढवे (6 वी), वेदश्री आवळे (6 वी), स्वरा शिंदे (7 वी), श्रावणी भोसले (8 वी) या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
अमित गावडे यांनी गुरु हा वयाने मोठा किंवा छोटा देखील असू शकतो असे सांगितले. त्यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ. पूनम जाधव यांनी भारतीय संस्कृतीत गुरु या शब्दाला देवतुल्य स्थान आहे. गुरु म्हणजे अज्ञान दूर करण्याचा मार्ग. गुरूंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अमूल्य स्थान आणि मातृ-पितृ पायपूजन सोहळ्याचे पावित्र्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीधर गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व सांगताना विविध उदाहरणांचा दाखला दिला. तसेच पालक व गुरुजन यांविषयी आदर विद्यार्थ्यांनी बाळगावा याविषयी मार्गदर्शन केले. संस्काराची रुजवणूक म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या वडीलधार्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा, असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे यांनी सर्व शिक्षकांना व पालकांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.
मुस्कान डांगे व परिणीती काळेबेरे यांनी सूत्रसंचालन केले. सृष्टी देवकुळे हिने आभार मानले.