तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुणवरेच्या प्रोग्रेसिव्हचा डंका; विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळेच यश : विशाल पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सद्गुरु हरिभाऊ महाराज शिक्षण संस्थेचे सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण येथे आयोजित 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गुणवरे मधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणांमध्ये तालुक्यातून सलग तिसऱ्यांदा यश मिळाले. या विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. तसेच तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये आदित्य रामदास कदम या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की; हे यश विद्यार्थ्यांचे अथक परीश्रम, त्यांना मार्गदर्शन करणारे व प्रोत्साहन देणारे शिक्षक यामुळे शाळेला मिळालेले आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने प्रोग्रेसिव्ह असेच यश मिळवीत राहील, यात कोणतीही शंका नाही.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच खाजगी माध्यमांच्या शाळांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनामध्ये जवळपास 290 वैज्ञानिक उपकरणे आली होती. प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरेने तालुकास्तरीय 50 वे व 51 वे विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच यावर्षीही तिसऱ्यांदा तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकविण्याचा मान मिळवला. इयत्ता सातवीतील विद्यार्थी रितिका दीपक सस्ते, आदित्य रामदास कदम, सुमित संतोष घाडगे या विद्यार्थ्यांनी पारंपारिक ऊर्जेची बचत व त्याचा पुनर्वापर या विषयाचे उपकरण बनवले होते.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक किरण भोसले, उपमुख्यध्यापिका सौ. स्वरदा जाधव, समन्वयीका सौ. सुप्रिया सपकाळ यांनी रितिका सस्ते, सुमित घाडगे आणि आदित्य कदम या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उषा आडके, सागर बाबर, स्वाती नाळे, राहुल गावडे, माधुरी बनकर यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकांनी कौतुक करून अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!