दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । सातारा । गेली चोवीस वर्षे अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजवणारा गुलमोहर डे महाराष्ट्र दिनी काव्यवाचन चित्रकाम तसेच गुलमोहराच्या विविध सजावटीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला . गुलमोहर ग्रुपच्या परिवारातील सदस्यांनी तसेच रंगकर्मी छायाचित्रकार यांनी रंगोत्सवालाउत्साहात हजेरी लावली.
24 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या यंदाच्या गुलमोहर डेला करोना संक्रमणाचे नियम शिथील झाल्याने सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई येथील रंगकर्मींची मोठी गर्दी होती . निसर्गाचा आविष्कार चित्रांच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आविष्कृत करणे हे गुलमोहोर डे चे वेगळे वैशिष्ट्य आहे . ज्येष्ठ चित्रकार सागर गायकवाड व त्यांना बावीस वर्षांपूर्वी प्रोत्साहित करणारे एस एस भोजने यांची या गुलमोहर डे ला आवर्जून उपस्थिती होती.
छोट्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण वातावरण उजळवून टाकणाऱ्या गुलमोहर वृक्षाच्या वेगवेगळ्या चित्राकृती कॅनव्हासवर सहजपणे चित्रित होत होत्या हा गुलमोहर डे दोन सत्रात साजरा करण्यात आला सकाळी चित्रकला मांडणी ,शिल्प, ज्येष्ठ कलावंतांचे मार्गदर्शन तर सायंकाळी काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या . पोवई नाका ते सातारा पोलिस कवायत मैदान या दरम्यानच्या रस्त्यावर रंगणारा गुलमोहर डे म्हणजे थेट लंडनमधल्या हॅपी स्ट्रीटचा अनुभव देत होता अनेक रंगकर्मींनी या गुलमोहर डे चे विशेषत्वाने कौतुक केले.
गुलमोहराच्या झाडाखाली चित्रकला शिल्प यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते बहावा जारुल आणि गुलमोहर या वृक्षांचे यावेळी वाटप करण्यात आले तसेच या तिन्ही वृक्षांचे चित्र आणि त्याची देखणी सजावट यावेळी गुलमोहर पार्क मध्ये उभारण्यात आली होती या कार्यक्रमात आबालवृद्धांचा लक्षणीय सहभाग होता रखरखत्या उन्हात गुलमोहोर बहावा शिरीष या झाडांच्या फुलांच्या रंगांची उधळण करावी आणि निसर्गाच्या रंगोत्सवात रंगून जावे तसेच पर्यावरण भान निर्माण करावे या उद्देशाने गुलमोहर डे साजरा केला जात आहे असे सागर गायकवाड यांनी सांगितले पुढील वर्षी गुलमोहर डे हा रौप्य महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे त्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.