…. तोपर्यंत आम्ही शांत आहोत, पण अंगावर आलात तर शिंगावर घेऊ : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटलांची फलटणमध्ये तोफ धडाडली


फलटणमध्ये गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विरोधकांवर जोरदार टीका. शंभूराज देसाई, निलेश राणे यांचीही उपस्थिती.

स्थैर्य, फलटण, दि. १९ डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. “आम्ही पानटपरी चालवणारी माणसे, आम्हाला धमक्या देऊ नका. जोपर्यंत अनिकेतराजे आणि त्यांच्या पॅनलच्या केसालाही धक्का लागत नाही, तोपर्यंत आम्ही शांत आहोत, पण अंगावर आलात तर शिंगावर घेऊ,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले.

शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आयोजित प्रचारसभेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, अनिकेतराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,

“विरोधक म्हणतात २२ वर्षांच्या मुलाला धमक्या देतात. अरे, आम्ही ज्या पक्षात आहोत तिथे धमक्यांना भीक घातली जात नाही. ज्याच्यावर केस नाही तो शिवसैनिक कसला? आम्ही ‘आय लव्ह यू मुख्यमंत्री’ म्हणणारे लोक आहोत. इथे दादागिरी चालणार नाही. अनिकेतराजे हे सुसंस्कृत उमेदवार आहेत, पण त्यांना कोणी डिवचले तर आम्ही गप्प बसणार नाही.”

रामराजे आणि विकासावर भर

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३०-३५ वर्षांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत पाटील म्हणाले की, “ज्या माणसाने कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी दिले, कारखाने आणले, त्या माणसावर टीका करणे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.” फलटणच्या विकासासाठी नगरपालिकेत एकहाती सत्ता हवी असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला आणि लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “पहिले महिला नवऱ्याकडे पैसे मागायच्या, आता उलट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम केले आहे. त्यामुळे महिलांचा कौल हा अनिकेतराजेंच्या बाजूनेच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • शंभूराज देसाई: “कोणी दादागिरी करत असेल तर याद राखा. पालकमंत्री म्हणून मी इथे उभा आहे. अनिकेतराजेंच्या विजयासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.”

  • निलेश राणे: “ही निवडणूक सेवेची आहे. ५ वर्षे शहराचे वाटोळे होऊ देऊ नका. अनिकेतराजेंसारखा तरुण चेहरा शहराचा कायापालट करेल.”

  • योगेश कदम: “गृहराज्यमंत्री आणि शिवसैनिक हे कॉम्बिनेशन डेंजर असते. त्यामुळे कोणीही कायद्याच्या बाहेर जाऊन वागू नये.”

या सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!