कृषीदूतांकडून जलकुंड बांधणीच्या प्रात्यक्षिकाचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत निसर्गमित्र गटाने माणगाव तालुक्यातील कोशिंबळे येथे अशोक मांजरे यांच्या शेतात शेतकर्‍यांसाठी जलकुंड बांधणीचे प्रात्यक्षिकाची माहिती दिली.

कृषी क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम कृषीदूतांनी घेतला. जलकुंड पाणी साठवण, सिंचन, मत्स्यपालन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयोगी ठरते. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचा वापर करून जलकुंडाची बांधणी अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवली. सदरील जलकुंडाचे आकारमान ४ मी. बाय २ मी. बाय १ मी. एवढे आहे. ज्याची पाणीसाठवण क्षमता ८००० लिटर इतकी आहे. जलकुंड पाणी साठवून वर्षभर सिंचनासाठी उपलब्ध करून देते.

कुंडातील पाणी गरजेप्रमाणे शेतांना सिंचन करण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. या व्यतिरिक्त कुंडात मत्स्यपालन केले जाऊ शकते, ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. जलकुंड पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते जैवविविधतेचे संरक्षण करते आणि वन्यजीवांना आश्रय देते. या विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, कृषी विज्ञान केंद्र, किल्ला रोहाचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर, विषयतज्ज्ञ डॉ. सचिन पाठक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!