दैनिक स्थैर्य | दि. १६ डिसेंबर २०२४ | फलटण |
ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी दीदी यांनी ‘मॉर्निंग असेंबली’मध्ये दत्त जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना गुरुदेव दत्तात्रय यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. गुरुंचा आदर कसा करावा तसेच गुरूंवर शिष्याची निष्ठा कशा पद्धतीने असावी, यांची उदाहरणे देऊन त्यांनी गुरूनिष्ठेचे महत्त्व सांगितले. मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले.
दत्त जयंतीच्या निमित्ताने त्यांनी सर्व शिक्षकांना कॅलेंडर वाटप करून दत्त जयंती उत्सव साजरा केला. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मेडिटेशन घेऊन त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
शाळेचे प्राचार्य गिरिधर गावडे यांनी विद्यार्थ्यांना गुरूचे महत्त्व व अभ्यासामध्ये एकाग्रतेचे महत्त्व प्रजापिता ब्रह्माकुमारी दीदींनी सांगितल्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच आपले मार्गदर्शन आमच्या मुलांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे सांगितले. दर शनिवारी बॅगलेस सॅटर्डे असल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबर मानसिक आणि बौद्धिक विकासावरही भर दिला आहे. या दिवशी सर्व शिक्षक मुलांकडून विविध क्रीडा प्रकारांचा सराव करून घेतात. शाळा नेहमीच मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर भर देत आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.