दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तहसील कार्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. जमादार बंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्रअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकर्यांच्या पिकांची हंगामानुसार माहिती, पीक सर्वेक्षण याचे महत्त्व लक्षात घेऊन व त्याचा प्रचार – प्रसार शेतकर्यांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने महाविद्यालयामध्ये ई-पीक पाहणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सचिन ढोले, उपविभागीय अधिकारी फलटण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी कृषि महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ई-पीक पाहणीबद्दल सविस्तर माहिती, पिकांची हंगामानुसार नोंदी करणे, खातेदारासंदर्भात माहिती, ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनबद्दल सविस्तर माहिती, ई-पीक पाहणी कशी करावी, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गावामध्ये ई-पीक पाहणीबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन श्री. सचिन ढोले यांनी देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी आज शेतकर्यांसाठी ई-पीक पाहणीचे महत्त्व व गरज तसेच उद्यानविद्या व कृषीच्या विद्यार्थ्यांनी महसूल विभागाला सहकार्य करून हे जनजागृती अभियान शेतकरीभिमुख होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्री. नामदेव काळे, नायब तहसिलदार फलटण, श्री. जे. बी. कोंडके, मंडल अधिकारी फलटण, सौ. आर. वाय. कदम, तलाठी फलटण, श्री. एल. एस. अहिवळे, तलाठी फलटण, श्री. सचिन क्षीरसागर, तलाठी फलटण, श्री. गणेश मोरे, तलाठी फलटण, श्री. कर्णे आण्णा, श्री. प्रल्हाद दंडिले, महाविद्यालयातील प्रा. सागर तरटे व प्रा. महेश बिचुकले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वर्षा खराडे आणि आभार कु. अस्मिता माळी यांनी मानले.