
स्थैर्य, सातारा, दि. 17 ऑगस्ट : तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून, संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी एका महत्त्वपूर्ण मार्गदर्शन समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत व लेखक किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ लेखक डॉ. राजेंद्र माने आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्या वतीने आयोजित या संमेलनाबाबत साहित्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी १९९३ साली ६६ वे संमेलन साताऱ्यात झाले होते, ज्याचे स्वागताध्यक्षपद स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले यांनी भूषवले होते. आता योगायोगाने त्यांचे सुपुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.
संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी विनोद कुलकर्णी कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ही मार्गदर्शन समिती निवडण्यात आली. या समितीतील तिन्ही सदस्य साहित्य क्षेत्रातील अनुभवी असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांचे मसाप शाहूपुरी शाखेच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे, तर २७ पुस्तके प्रकाशित झालेले डॉ. राजेंद्र माने हे विविध साहित्य संस्थांवर कार्यरत आहेत. नंदकुमार सावंत हे शाखेच्या स्थापनेपासून उत्कृष्ट नियोजनासाठी ओळखले जातात. ही समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे काम करेल, अशा शुभेच्छा स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत.