विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीर उपयुक्त – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२३ । पुणे । दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्त्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोथरूड येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च शिक्षण सहसंचालक वाय. पी.पारगावकर, जिल्हा रोजगार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून युवकांनी विविध क्षेत्रांची माहिती घेऊन योग्य पर्यायाची निवड करावी आणि जीवनात यश संपादन करावे.

दहावी-बारावीनंतर योग्य माहिती न मिळाल्यास चुकीचे क्षेत्र निवडले जाण्याची शक्यता असते, पर्यायाने भविष्यात  निराशा पदरात पडते. म्हणून विविध अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. शासनातर्फे विदेशात जाणाऱ्या २०० विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ३० लाख याप्रमाणे ५ वर्षात दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व शुल्क शासन भरते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, पालकांचे उत्पन्न अल्प असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठासाठी ५ लाखापर्यंत शुल्क शासन भरणार आहे. अशा विविध योजनांची माहिती शिबिरातून मिळते असे सांगून कौशल्य विकासाच्या माध्यमातूनही चांगले करिअर घडविता येत असल्याने विद्यार्थ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहनही मंत्री श्री.पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!