दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । फलटण । फलटणचे उपनगर समजल्या जाणार्या कोळकीमधील श्री बजरंगबली मिलनच्या सदस्यांनी मालोजीनगर येथील हनुमान मंदिर येथे गुढी उभारुन गुढीपाडवा उत्साहात साजरा केला व मराठी नववर्षाचे स्वागत केले.
यावेळी गुढीपाडव्याचे महत्त्व विषद करताना, गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो, असे श्री बजरंगबली मिलनच्या सदस्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला कोळकीच्या मालोजीनगर येथील श्री बजरंगबली मिलनच्या सदस्यांनी श्री हनुमान मंदिराची साफ सफाई केली.