उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया… निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया…, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.


Back to top button
Don`t copy text!