
दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। सातारा । सालाबाद प्रमाणे मराठी चैत्र महिन्याचा प्रारंभ चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याने केला जातो. याही वर्षी एकीकडे सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले असले तरी सोने-चांदी खरेदीसाठी सातारकरांचा विशेष उत्साह जाणवत होता. घरोघरी पारंपारिक पद्धतीने ब्रम्हध्वज अर्थात उंचच उंच गुढी उभारून सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी हा गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
रविवारी सकाळी प्रथम घरोघरी कडुनिंब चूर्णचे प्राशन केल्यानंतर दारामध्ये तसेच अंगणामध्ये भव्य महा रांगोळ्या काढून महिलांनी गुढी उभारण्याची विशेष तयारी केली त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाच्या हस्ते उंच अशा बांबूच्या काठीला भरजरी साडी, साखरगाठी, चाफ्याच्या फुलांची माळ, लिंबाच्या पानांचा ढाळा आणि त्यावर तांब्याचा कलश उपडा घालून ही भव्य गुढी उभारून तिला त्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करत ‘ब्रह्मध्वजाय नम:’ असे म्हणत वंदन करण्यात आले. दुपारी महानैवेद्य दाखवून त्यानंतर सायंकाळी या गुढी सूर्यास्तापूर्वी उतरवण्यात आल्या.
दरम्यान घरोघरी गुढीपाडवा साजरा होत असतानाच बाजारपेठेत आवक झालेल्या हापूस आंब्याने घरोघरी मिस्टानाचा बेत अधिकच सुग्रास केला .तसेच आम्रखंड, मलई श्रीखंड, रसमलई, बासुंदी असे पदार्थ घरोघरी नैवेद्यासाठी तसेच मिष्ठांन म्हणून बनवण्यात आले. दुपारनंतर पंचांगातील वार्षिक राशिभविष्य चे पान वाचून सायंकाळी या गुढ्या उतरून घरोघरी लहान मुलांना तसेच नव विवाहित सुवासिनींना साखरगाठी घालून शुभेच्छा देण्यात आल्या. परिसरातील श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी तसेच एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती.