स्थैर्य,मुंबई, दि. 22 : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून पुढील संभाव्य वाढ लक्षात घेता रुग्णांच्या उपचाराकरिता सर्व कोविड केअर सेंटरवर मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा तसेच गरज पडल्यास बाधित रुग्णांकरिता खाजगी क्षेत्रातील रुग्णालयातून आवश्यक खाटांची पूर्तता करून कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले.
कोरोना उपाययोजनांचा आढावा तसेच जिल्हा क्रीडा संकुलच्या कामांचा आढावा मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकरी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे बैठकीला उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधाकरिता बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा जलद शोध घेऊन तपासणीचे प्रमाण तसेच उपलब्ध लससाठ्यानुसार लसीकरणाचा वेग वाढविणेही गरजेचे असून ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येत आहे, त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना प्रतिबंधाकरिता विविध सुपरस्प्रेडरचे 39 गट पाडून तपासणी करण्यात येत असल्याचे तसेच ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हा क्रीडा संकुलातील कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी जिल्हा क्रीडा संकुलातील कामांचादेखील आढावा घेतला. क्रीडा संकुल येथे नव्याने तयार होत असलेले फुटबॉल मैदान, 400 मी. सिंथेटीक ट्रॅक व प्रसाधनगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या ठिकाणी इनडोअर गेम सुरू करण्याची व्यवस्था तसेच संरक्षक भिंतीलगत व्यापारी संकुलाचे बांधकाम करता येईल का याबाबत देखील चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला पोलीस उपअधीक्षक शेखर देखमुख, शिक्षणाधिकरी उल्हास नरड (माध्यमिक), दिपेंद्र लोखंडे (प्राथमिक), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.डी.मेंढे, राजेश नायडू, कुंदन नायडू, डॉ.किर्तीवर्धन दिक्षीत व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.