तोक्ते चक्रीवादळातील बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि.२०: तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा ज्यांना ज्यांना फटका बसला आहे अशा सर्व बाधितांना राज्य सरकार व पालकमंत्री म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पाहणी व आढावा घेण्यासाठी त्यांनी वैभववाडी, देवगड तालुक्यांचा दौरा केला. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

प्रारंभी वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळामुळे 46 गावे बाधीत झाल्याची माहिती तहसीलदार रामदास झळके यांनी दिली.

आपदग्रस्तांना धान्य वेळेवर पोहोचेल याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, तसेच बाधित गावातील ज्या नळ पाणी योजना विजेअभावी बंद आहेत त्या ठिकाणी उच्च क्षमतेचे जनरेटर बसवून त्या त्या गावातील नळ पाणी योजना तात्काळ सुरू करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आदेशही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले. त्याचबरोबर देवगड तालुक्याचा आढावा घेत असताना चक्रीवादळात ज्या 4 खलाशांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावर तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. आनंदवाडी बंदर येथे आपत्कालीन यंत्रणा तसेच तहसिल कार्यालय, देवगडच्या आवारात आपत्कालीन कक्ष येत्या 15 दिवसात सुरू करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!