‘शाहू महाराजांचे जीवन व कार्य ‘ वरील चित्ररथाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । कोल्हापूर । राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर तयार करण्यात आलेल्या सुबक कलाकृतींवरील चित्ररथांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा सर्वत्र जागर होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत ‘शाहू महाराजांचे जीवन व कार्य’ यावर आधारित चित्ररथ मिरवणूकीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज डी. पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून शाहू मिल येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापुरकर, अर्थ मुव्हर्स असोसिएशनचे रवी पाटील, बांधकाम व्यवसायिक अजयसिंह व्ही. देसाई , बांधकाम व्यवसायिक श्री बिल्डर्स व डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे राजूभाई पारीख, आयडील ग्रुप चे अतुल पोवार, वरद डेव्हलपर्स चे संजय चव्हाण, अनंत खासबारदार, प्राचार्य अजेय दळवी, डॉ.संदीप पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, लोककल्याणकारी शाहू महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले. या दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाबद्दल सर्व थरातून नागरिकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. शाहू महाराजांच्या स्मृती दिनी जिल्ह्यातील नागरिकांनी लोकराजाला मानवंदना दिली. लोकराजाप्रति सर्वजण 100 सेकंद नतमस्तक झाल्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल.
पन्हाळा मुख्य रस्ता सुरु झाल्यामुळे पर्यटकांची रीघ वाढली आहे. पर जिल्ह्यातून पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांना शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी एखाद्या रविवारी संपूर्ण दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कृतज्ञता पर्व समिती सदस्य उदय गायकवाड, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, ऋषिकेश केसकर, कविता गगराणी, सुखदेव गिरी, जयदीप मोरे,उपस्थित होते.

दरम्यान पुणे विभागाच्या भूसंपादन उपायुक्त नंदिनी आवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चित्ररथाला भेट देवून आनंद व्यक्त केला. कृतज्ञता पर्व च्या माध्यमातून राजर्षी शाहूंचे कार्य सर्वदूर पोहोचवण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

चित्ररथाद्वारे पोहोचवण्यात येणार राजर्षी शाहू महाराजांचे जीवन कार्य
प्राचार्य अजेय दळवी, सत्यजित निगवेकर, मंगेश कुंभार, संतोष कुपेरकर तसेच अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, शितल दुर्गुळे यांनी साकारलेल्या या चित्ररथांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहणाचे दृश्य दर्शविणारा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा पहिला चित्ररथ आहे.

माणगाव परिषद, छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कोल्हापुरात केलेले स्वागत यावर आधारित एक चित्ररथ आहे.
शाहू महाराजांची जलसिंचनाची दूरदृष्टी, राधानगरी धरण ओलिताखालील क्षेत्र, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्यात राधानगरी धरणाचे योगदान या विषयावर चित्ररथ आहे.
प्राथमिक शिक्षणावर आधारित चित्ररथ असून यात मुलींसाठी शिष्यवृत्ती, विविध धर्मियांसाठी वसतीगृह, सद्यस्थितीतील शिक्षण व्यवस्थेविषयी माहिती देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी जपला व महाराजांनी आधुनिक शिक्षणाची कास धरली, मानवतावादी विचारांनी समाजाचा विकास केल्याचा संदर्भ चित्ररथात दिसून येतो.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मियांना मंदिर प्रवेश खुला केला. छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सुरु करुन चर्च आणि मशीद यांचाही सन्मान राखल्याचे संदर्भ दिसतात. तसेच स्वतःच्या आईंच्या नावे अंबाबाईच्या मंदिरात घाटी दरवाज्याजवळ घंटा देऊन आईचे ऋण जपल्याचे विचार कलाकृतीतून साकारण्यात आले आहेत.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बांधकाम करण्यात आलेल्या इमारतींच्या प्रतिकृती चित्ररथातून साकारण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर शहरात चित्ररथाचा रविवारचा मार्ग असा होता..

शाहू मिल – उमा टॉकीज – सावित्रीबाई फुले हॉस्पिटल – मिरजकर तिकटी – शाहू बँक – नांगिवली चौक – जुना वाशी नाका – तलवार चौक – रंकाळा – रंकाळा बस स्थानक – गांगावेश – पापाची तिकटी – महापालिका इमारत – मटण मार्केट – बिंदू चौक – आझाद चौक – उमा टॉकीज – फोर्ड कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – गोकुळ हॉटेल – शाहूपुरी व्यापारी पेठ – पार्वती टॉकीज चौक – बागल चौक – राजारामपुरी कॅसल हॉटेल रोड – राजारामपुरी महापालिका शाळा नं. ९- शाहू मिल..

सोमवार पासून हे चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नेण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!