पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला,दि.२७: स्व. बाबुराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार प्रदान सोहळा आज येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.

हॉटेल सेंटर प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, महापौर अर्चना मसने तसेच देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चना मसने होत्या.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॅडी देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॅडी देशमुख यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा माहितीपटही दाखवण्यात आला.

यावेळी  आ.अमोल मिटकरी म्हणाले की, कला क्षेत्रात युवक युवतींनी पुढे यावे. जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. नव्या  जोमाच्या तरुण तरुणींनी अकोल्याचा कला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक व्हावा, हे डॅडी देशमुखांचे स्वप्न पूर्ण करावे, असं आवाहन केलं.

सन्मानार्थी  अरुण घाटोळे यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले की, रंगभूमी ही माणसाला वास्तविक माणूस म्हणूनच दाखवते. माणसाला माणूस म्हणून दाखवणाऱ्या या वास्तव माध्यमातच मी काम केले. नाटकातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य रमेश थोरात, माहितीपट निर्माते डॉ. राजेश देशमुख, सौंदर्य स्पर्धा विजेती कु.पूजा विष्णू मुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात महापौर मसने यांनी शहरातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी सहयोग देऊ, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम बीडकर यांनी केले. प्रा. मधु जाधव यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.आभार प्रदर्शन सदाशिव शेळके यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!