शासकीय व खाजगी रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, बुलडाणा, दि. २६: जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. तरी या रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करून घ्यावे. जे खाजगी कोविड रुग्णालय आठ दिवसात फायर ऑडिट पूर्ण करून घेणार नाही, अशा खाजगी कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी श्री अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय स्तरावर खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद येथे मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती युद्धपातळीवर करण्यात यावी. तसेच खाजगी व शासकीय रुग्णालयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता यासंदर्भात प्रत्येक तहसीलस्तरावर एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून अगोदरच आढावा घेऊन मागणी नोंदवावी, असे आदेशही पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यात काही लोक रेमेडिसिवीरची काळाबाजारी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खाजगी रुग्णालयात रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन दिल्यावर खाली झालेल्या बॉटलवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे वेळोवेळी ऑडिट करावे. जे रुग्णालय याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाही करावी. पोलिसांनी देखील रेमेडिसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा सूचनादेखील पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी लसीकरणाचा, स्वब तपासणी अहवाल व लोकडाऊनचा देखील आढावा घेतला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण फार गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. तसेच लॉकडाऊनची काटेकोरपणे पोलीस विभागाने अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवावा. विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व येणाऱ्यवर कारवाही करावी. लग्नांमध्ये नियमापेक्षा जास्त मंडळी असल्याचं त्यांच्यावर देखील कडक कारवाही करावी, असे आदेशही पोलीस प्रशासनाला यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले. याप्रसंगी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!