पालकमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची संयुक्त पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला, दि. २३: जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे आज राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी भेट देऊन पाहणी केली.

त्यांचे समवेत विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल रहाटे आदींचा समावेश होता. येथील ओझोन वायु निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन  त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करण्याबाबत त्यांनी ही प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही.  त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यासाठी तातडीने तांत्रिक तज्ज्ञांचे पथकाने दिवसभरात पाहणी करुन अहवाल द्यावा,असे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी येथे दिले.

याच परिसरात असलेल्या प्रकल्प विभागाच्या जागेची ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यांनी पाहणी केली. या जागेत विद्युतीकरण, लाईट, पंखे, पाण्याची सोय आहे. त्यामुळे याठिकाणी हॉल मोकळा करुन रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली तर या जागेचा कोविड केअर सेंटर म्हणून उपयोग करता येईल, त्यासाठी तातडीने स्वच्छता व आवश्यक बाबींची कार्यवाही करावी, अशा सूचनाही ना. कडू यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!