
स्थैर्य, नंदुरबार, दि. ११: जिल्ह्यातील डॉक्टरांनी रेमडिसीवीर औषधाचा उपयोग केवळ गरजू रुग्णांसाठी करावा. रेमडेसिवीरबाबत नागरिकात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टरांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आणि जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, रुग्णालयांनी रेमडेसिवीर औषधासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी. रुग्णाचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णांच्या मनातील भीती घालवितांना त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करावे. शासनाने निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालयाबाहेर लावावा.
कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याने एमडी मेडिसीन डॉक्टरांनी आठवड्यातील एक दिवस आपली सेवा जिल्हा प्रशासनास द्यावी. जिल्ह्यातील डॉक्टरांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आदिवासी भागात डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेने स्वयंस्फुर्तीने आपली सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी द्यावी. डॉक्टराचे काम हे देवाप्रमाणे आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे कार्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ.भारुड म्हणाले, डॉक्टरांनी रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी सहकार्य करावे. रेमडेसिवीर औषधाचा उपयोग मार्गदर्शक सुचनेनुसार करावा. आवश्यक नसताना सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेडचा उपयोग करू नये. संकटाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. काही दिवसातच आरटीपीसीआरची दुसरी प्रयोगशाळा सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.