स्थैर्य, मुंबई, दि. २३: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांसह विविध प्रकल्पांचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. सर्व कामे नियोजनानुसार वेळेत आणि शक्य तेवढ्या जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.
काल झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) तथा जल अभियंता अजय राठोड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलनि:सारण) श्री. कमलापूरकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) राजेंद्र तळकर आदी सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेली निरनिराळी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कोरोना संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना सुयोग्य प्रकारे अंमलात आणाव्यात, तसेच संबंधित कामांच्या नियोजनावर विपरित परिणाम होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.
शहरातील नाल्यांची स्वच्छता व पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची कामे याविषयी आढावा घेण्यात आला. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना प्रामुख्याने नालेसफाई, संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी होत असलेली कामे तसेच वेगवेगळ्या प्राधिकरणांसोबत करण्यात येत असलेला समन्वय याबाबत अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी माहिती दिली. मुंबईत यंदा वेगवेगळ्या सखल भागांमध्ये पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी 470 पंप लावण्यात येतील. मुंबई शहर व उपनगरातील उद्दिष्टांपैकी मोठ्या नाल्यांमधून 43 टक्के आणि मिठी नदीतून 24 टक्के गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील हिंदमाता आणि गांधी मार्केट या अत्यंत सखल परिसरामध्ये पावसाळ्यात हमखास पाणी साचते. त्याठिकाणी पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी होत असलेल्या कामांची पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात माहिती देताना श्री. वेलरासू म्हणाले की, पर्जन्य जल उदंचन केंद्रांमुळे पूर्वीपेक्षा हिंदमाता व गांधी मार्केट परिसरातील पाण्याचा निचरा आता जलदगतीने होतो. आता गांधी मार्केट भागात 16 हजार घन मीटर प्रति तास क्षमतेने पाणी उपसा करु शकणारे 2 पंप बसविण्यात येत आहेत. 1200 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीतून हे पाणी भारत नगर रेल्वे नाल्याजवळ सोडण्यात येईल. त्याचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. सुमारे 14 कोटी रुपयांच्या या कामामध्ये 4 वर्षाच्या परिरक्षणाचा देखील समावेश आहे. हिंदमाता परिसर हा बशीसारखा खोल परिसर असून त्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचते. यावर उपाय म्हणून 60 हजार घन मीटर जलधारणा क्षमता असलेली भूमिगत टाकी प्रमोद महाजन उद्यान येथे तर 40 हजार घन मीटर जलधारणा क्षमता असलेली भूमिगत टाकी सेंट झेवियर्स मैदान येथे बांधण्यात येत आहे. हिंदमाता पुलाखाली व मडकेबुवा चौकात देखील भूमिगत टाकी बांधली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमोद महाजन उद्यानातील टाकीमध्ये 15 हजार घन मीटर तर सेंट झेवियर्स मैदानातील टाकीमध्ये 14 हजार घन मीटर पाणी साठवता येईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही परिसरास मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि नियोजीत वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.
यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वे, मेट्रो यांच्यासमवेत करावयाच्या कामांचाही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. रस्ते व वाहतुकीशी संबंधित कामांचीही माहिती घेतली. मलबार हिल येथे मागील पावसाळ्यात भूस्खलन झाले होते. त्याठिकाणी सुरु असलेल्या पुनर्स्थापना कामांची माहिती घेतली. भूस्खलन झालेल्या ठिकाणी टेकडीची पडझड होऊ नये म्हणून माती रोखण्यासाठी सुमारे 105 मीटर लांबीची उंच भिंत बांधण्यात येत असून ही भिंत व टेकडी या दरम्यान भराव करण्यात येत आहे. जेणेकरुन टेकडी स्थिर राहील. त्यासोबत काँक्रिट रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. टेकडी लगतच्या रस्त्यांची कामे देखील वेगाने करण्यात येत असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांचीही माहिती यावेळी देण्यात आली. महानगरपालिका आणि इतर शासकीय यंत्रणांच्या अखत्यारितील रस्त्यांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच मुंबईतील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी पुढील 5 वर्षाचा प्रशासकीय विभागनिहाय मास्टर प्लान तयार करण्याचीही त्यांनी सूचना केली.
यावेळी माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला या दरम्यान नियोजित असलेल्या बोर्ड वॉक प्रकल्पाचे संकल्पना सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प राबविताना पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग करुन सायकल मार्गिका, पादचारी मार्गिका बांधावी, 5मीटर रुंद आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू दृश्यासाठी अडथळा ठरणार नाही या पद्धतीने बांधकामाचे नियोजन करावे, अशी सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी केली. तसेच एमएसआरडीसी, एमएमआरडीए आदी संबंधीत प्राधिकरणांसमवेत समन्वय बैठका घेऊन ना-हरकत प्राप्त करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
पवई तलाव परिसराचे जतन आणि सौदर्यीकरण तसेच तलावालगत सायकल मार्गिका, पादचारी मार्ग या संदर्भात सादरीकरण झाले. या कामाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. या तलावामध्ये सांडपाणी येण्यापासून रोखणे, तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगती वायूविजन व्यवस्था तसेच पाण्यातील वनस्पती काढण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांविषयी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी माहिती घेतली.