मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा


स्थैर्य, मुंबई, दि.१९: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या संदर्भाने पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण याबाबतही सादरीकरण करण्यात आले आणि आढावा घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह महापालिकेचे सहायक आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते.

मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच टनेलिंगची कामे, पूर नियंत्रण, पंपिंग स्टेशन आदी बाबींचा यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. यानंतर झालेल्या बैठकीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि सहाय्यभूत ठरेल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!