स्थैर्य, अलिबाग, दि. १८: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17 मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथील स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत तातडीने पाहणी केली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी खानाव, वावे, मल्यान, कुरुळ या गावांना दिलेल्या भेटीत खानाव, उसर, वेलवली गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या झालेल्या नुकसानीची, घरांच्या झालेल्या नुकसानीची तसेच कुरुळ परिसरात महावितरणकडून वीजेचे नवीन पोल बसविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, त्याबाबतची पाहणी केली.
पालकमंत्री कु. तटकरे यांनी ग्रामीण विकास पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वेंगुर्ले यांना खानाव- ऊसर येथे पाण्याची नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.