
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (खासदार गट) अधिकृत उमेदवार तथा शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या प्रचाराने मोठा वेग घेतला आहे. प्रभागातील नागरिक, विशेषतः तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता, राहुल निंबाळकर यांची उमेदवारी ही विकासाची नांदी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘फक्त आश्वासने नाही, तर ठोस काम’ या भूमिकेतून त्यांनी मतदारांशी साधलेला संवाद प्रभावी ठरत आहे.
प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय उराशी बाळगून राहुल निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे निंबाळकर यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हे माझे प्रथम कर्तव्य असेल, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.
सध्या प्रभाग क्रमांक १३ मधील भडकमकर नगर, पोलिस स्टेशन कॉलनी, इरिगेशन कॉलनी, गोळीबार मैदान, विद्यानगर, लक्ष्मीनगर, डी. एड. कॉलेज चौक आणि डॉ. रसाळ हॉस्पिटल परिसर या भागांमध्ये निंबाळकर यांनी पिंजून काढला आहे. घरोघरी जाऊन संपर्क साधताना त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. केवळ प्रचार न करता नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन ते देत आहेत.
या निवडणुकीत राहुल निंबाळकर यांच्या पाठीशी तरुणांची एक मोठी फळी उभी राहिली आहे. तरुणांचा हा उत्साह आणि जोडीला ज्येष्ठ नागरिकांचे मिळणारे आशीर्वाद हेच निंबाळकर यांच्या विजयाचे गमक ठरणार आहे. प्रभागातील प्रत्येक भागात, प्रत्येक कॉलनीत फिरताना ‘आपल्या हक्काचा माणूस’ अशीच त्यांची ओळख मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या साध्या आणि सेवाभावी स्वभावामुळे महिला वर्गातूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
राहुल निंबाळकर यांनी केलेल्या कामांची पोचपावतीच त्यांना या निवडणुकीत मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोळीबार मैदान परिसर. या ठिकाणी गेल्या ३० वर्षांत साधे गटारही नव्हते. मात्र, राहुल निंबाळकर यांनी पुढाकार घेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण गोळीबार मैदानात बंदिस्त गटार योजना मंजूर करून आणली. इतकेच नव्हे तर, बहुतांश भागात या गटारीचे काम पूर्णत्वास नेऊन त्यांनी रहिवाशांची मोठी गैरसोय दूर केली आहे.
पावसाळ्यात हडको कॉलनी येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने रहिवासी त्रस्त होते. या समस्येची तातडीने दखल घेत राहुल निंबाळकर यांनी त्या ठिकाणी रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांची या त्रासातून मुक्तता केली. रस्ते आणि पाणी या मूलभूत प्रश्नांसाठी ते सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात, हे या कामांतून सिद्ध झाले आहे.
राहुल निंबाळकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता. प्रभागात एखादी छोटीशी समस्या असो किंवा एखादे कुत्रे मृत पावल्यासारखी घटना; निंबाळकर कधीही नगरपालिकेच्या गाडीची वाट पाहत बसत नाहीत. ते स्वतः पुढाकार घेऊन, स्वतःच्या माध्यमातून ती घाण उचलण्याचे काम करतात. ‘एका हाकेला धावून येणारा नेता’ अशी त्यांची ओळख याचमुळे निर्माण झाली आहे.
येत्या काळातही प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि प्रभागाला आदर्श बनवण्यासाठी मतदारांनी आपल्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राहुल निंबाळकर यांनी केले आहे. यापूर्वीही विकासाच्या कामात आपण मागे पडलो नाही आणि यापुढेही पडणार नाही, या त्यांच्या शब्दावर मतदारांनी विश्वास दर्शवला असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये विजयाचा गुलाल राहुल निंबाळकरच उधळणार, अशी चर्चा आता जोरात सुरू आहे.

