स्थैर्य, सातारा, दि. १० : सातारा तालुक्यातील शिक्षकांची गतवर्षी इतर तालुक्यात बदली झाली आहे. त्या शिक्षकांना अजून ही सर्व्हिस बुक दिले गेले नाही. बदलून गेलेल्या शिक्षकांना तेथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सर्व्हिस बुक असल्याशिवाय पगार काढणार नाही असे फर्मान निघाले आहे. अगोदरच कोरोनामुळे व्यापलेले शिक्षकांचे पगार सर्व्हिस बुक नसल्याने अडवले गेले आहेत. सातारचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांचा हेकेखोरपणा येथे ही सुरू असून त्यांनी शिक्षकांची सर्व्हिस बुक गेली एक वर्ष दिली गेली नाहीत. त्यांना कारवाईची कसलीच भीती उरली नसून शिक्षकामधून उद्रेक होण्याची शक्यता आहे.
सातारा पंचायत समितीच्या पदाधिकारी यांचे ही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पिढी घडवण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांची अडवणूक जिल्ह्यात सगळ्यात जास्त सातारा तालुक्यात होत आहे. याचा अनेकदा पर्दाफाश तरुण भारतने केला आहे. अगोदरच कोरोनाच्या धास्तीने दिलेले काम निमूटपणे शिक्षक करत असताना त्यांना पगार मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा काही शिक्षकांना सर्व्हिस बुक नसल्याने त्यांचा पगार काढला जात नाही ही बाब समोर आली. गतवर्षी ज्या शिक्षकांच्या इतर तालुक्यात व इतर जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. त्यांना सर्व्हिस बुक व सातव्या वेतन आयोगाचे विवरण पत्र महत्वाचे मानले जात आहे. मात्र, सातारचे गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांनी समोर टेबलावर पडलेल्या सर्व्हिस बुकवर सह्याच गेल्या तीन दिवसांपासून केल्या नाहीत. शिक्षक येतात तर हे कुठं मोबाईलमध्ये तर कुठे तडक उठून निघून जात आहेत. त्यामुळे यादी केलेल्या त्या शिक्षकांची लिपिकांनी सर्व्हिस बुक तयार करून ठेवली आहेत. यांच्याकडून त्यावर सही होत नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशीच त्यांची वागणूक राहिली तर उद्रेक होण्याची शक्यता असून या बाबीकडे सातारा पंचायत समितीचे पदाधिकारी म्हणुन सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव यांच्यासह सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे. यांना कोणत्याही कारवाईची भीती वाटत नसून हम करे सॊ याप्रमाणे त्यांचे कामकाज सुरू आहे.
सातारचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्याकडून शिक्षकांना नेहमी त्रास होत आहे. गतवर्षीच्या बदल्या झालेल्या शिक्षकांना अजून ही सर्व्हिस बुक दिली गेली नाहीत. मात्र, पाटण तालुक्यातील बदली झालेल्या शिक्षकांचे सर्व्हिस बुक तेथील विस्तार अधिकारी यांनी तयार करून पोस्टाने पाठवून दिल्या. त्यांच्या कामकाजाचा आदर्श यांनी घ्यावा अशी चर्चा सुरू आहे.
सभापती मॅडम जरा लक्ष घाला..मराठीत चित्रपट आहे. त्या चित्रपटातल्या प्रमाणे सातारा तालुक्यातील शिक्षणाचे सारेच वाटोळे हे गटशिक्षणाधिकारी आल्यापासून झाले असल्याचा आरोप काही पंचायत समिती सदस्यांनीच केला आहे. सातारा तालुक्यातील शिक्षण विभागला शिस्त लावायची असेल, गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांचा मनमानीपणा थांबवायचा असेल तर सभापती सरिता इंदलकर यांनीच लक्ष घालावे अशी ही काही शिक्षकांनी मागणी केली आहे. त्यांनी ही कोणत्या दबावाला बळी न पडता ऍक्शन घ्यावी अशी मागणी होत आहे.