स्थैर्य, सातारा, दि. २७ : पूर्वीच्या निसर्गचक्राप्रमाणे पाऊस झाल्यामुळे योग्य वेळी पेरणीची कामे पूर्ण झाली. त्यामुळे डोंगरी विभागातील सोयाबीन, भुईमूग, भात, आडसाली ऊस लागणीतील आंतरपिके जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे. सध्या पिकांना पावसाची गरज आहे.
यावर्षी निसर्गचक्राप्रमाणे जून महिन्याच्या दुसर्या व तिसर्या आठवड्यात पेरणी कामे गतीने झाली. त्यातच पावसाला प्रारंभ झाल्याने पेरणी, टोकणी केलेली पिके चांगल्या पद्धतीने त्याची उगवण झाली आहे तर काही शेतकर्यांनी आडसाली लागणीसाठी साडे चार फुटी सरी पाडून त्यामध्ये 86032 या वाणाची उसाची लागण केली असून त्यावर सोयाबीन, भुईमूग यांची आंतरपिके घेतली आहेत. त्यातील भुईमूग, सोयाबीन ही पिके जोमदार आली आहेत. सध्या पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना जोर आला आहे. सध्या लॉकडाउनचा कालावधी असल्यामुळे परिसरातील येळगाव, नांदगाव, येणपे, टाळगाव, जिंती, साळशिरंबे, मनू, ओंड, तुळसण, सवादे आदी परिसरातील पिकांच्या अंतर्गत मशागतीने जोर धरला असून शेतांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकूणच वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे पिके जोमाने वाढली आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर उत्पन्नही चांगले निघेल. त्यामुळे शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी हनुमंत लोखंडे म्हणाले, निसर्गचक्राप्रमाणे पावसाला सुरुवात झाली. शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. पिकेही जोमात आली असून सध्या पिकांना पावसाची गरज आहे. पाऊस जर झाला तर उत्पन्नही चांगले निघेल.