स्थैर्य, दि.१८: यावेळी लडाखमध्ये थंडी लष्कराला चांगलीच जड जाणार आहे. कारण १९६२च्या चीन युद्धानंतर प्रथमच भारतीय लष्कर चीनलगतच्या आघाडीच्या पोस्ट थंडीतही सोडणार नाही. मागील वर्षापर्यंत आपण आपले बहुतांशी तळ थंडीत खाली करतो. ऑक्टोबरच्या अखेरपासून तळ सोडण्याचे काम सुरू होते आणि मार्चमध्ये परत येतो. सध्या थंडीत तळावरील तैनाती चीनच्या कारवायांवर अवलंबून असते. हिवाळा येण्यात ४-५ आठवडेच राहिले आहेत. हिवाळ्यात येथील तापमान उणे ५० अंशांपर्यंत असते. यात जवान जास्त दिवस तैनात राहतील. यामुळे खर्च जास्त येईल. लष्कराने पुढील वर्षभराचे रेशन लडाखमध्ये जमा केले आहे.
लडाखमध्ये लष्कराच्या १४व्या कोअरमध्ये ७५ हजार सैनिक आहेत. यावेळी ३५ हजार जादा बळ तेथे पाठवले आहे. चीन वादादरम्यान लष्कराने नुकतेच त्यांचे तीन डिव्हिजन, टँक स्क्वॉड्रन आणि आर्टिलरी, लडाख सेक्टरमध्ये आणले आहे. १५ हजार ते १९ हजार फूट उंचीवरील लष्कराच्या तळावर एका सैनिकाचा वर्षभराचा खर्च १७ ते २० लाख रुपये येतो. यात शस्त्र, दारूगोळ्याच्या खर्चाचा समावेश नाही. जगातील कोणतेही लष्कर एवढ्या उंचीवर इतके लष्कर तैनात करत नाही. लडाखच्या १४ व्या कोअरच्या नावावर हिवाळ्यात सर्वाधिक साहित्याचा साठा करण्याचा विक्रमही आहे.
ऑक्टोबर महिन्यात लडाखला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारे दोन्ही रस्ते जोजिला व राेहतांग बंद होतात. रस्ते बंद होण्याआधी दरवर्षी ३ लाख टन साहित्य लष्करासाठी लडाख येथे पोहाेचते. अॅडव्हान्स विंटर स्टॉकिंगमुळे सहा महिन्यांपर्यंत लष्कर लडाखमध्ये राहते. मार्च ते ऑक्टोबर दरम्यान सैन्य दररोज १५० ट्रक रेशन, औषधी, शस्त्र, दारूगोळा, कपडे, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स लडाखमध्ये पाठवते. यात केरोसीन, डिझेल व पेट्रोलचाही समावेश आहे. यांच्या साहाय्याने हिवाळा काढला जातो. हिवाळ्यात प्रत्येक जवानावर विशेष कपडे व तंबूसाठी एक लाख रुपये खर्च होतात. यात तीन लेअरचे जॅकेट, बूट, चष्मा, मास्क व तंबू सामिल आहे.
कारगिल जवळ द्रास सायबेरिया नंतर जगातील दुसरे सर्वात थंड ठिकाण आहे. येथे हिवाळ्यात तापमान उणे ६० अंशांपर्यंत जाते. द्रासची उंची ११ हजार फूट, कारगिलची ९ हजार फूट, लेहची ११४०० फूट आहे. तर सियाचीनची १७ हजार ते २१ हजार फूट आहे. भारत एकमेव देश आहे ज्याला सियाचीनसारख्या जागेवर लष्कर तैनातीचा अनुभव आहे.