
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण येथील माळजाई मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ आणि ‘ओपन जीम’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन उद्या, सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने, आमदार काँम्रड हरिभाऊ निंबाळकर उद्यान, काळज यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष निधीतून हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
या भूमिपूजन समारंभासाठी लायन डिस्ट्रीक्ट ३२३४D१ चे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चित्रकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तसेच, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, मागील प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, रिजन चेअरमन नीलम पाटील आणि झोन चेअरमन जगदीश करवा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश साळुंखे, सचिव निखिल सोडमिसे, खजिनदार स्वप्नील सोडमिसे तसेच माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, सचिव विजय पाटील आणि खजिनदार महेश गरवालिया यांनी केले आहे.