
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण शहरातील जिंती नाका परिसरात असलेल्या न्यू धनंजय किराणा स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील ४३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. ७ ऑगस्टच्या रात्री ते ८ ऑगस्टच्या सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुकान मालक कमलाकर जगताप हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या भावाला दुकानाचे शटर उचकटलेले आणि कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ दुकान मालकाला माहिती दिली.
दुकान मालकाने आतमध्ये जाऊन पाहिले असता, दुकानाच्या गल्ल्यातील ४३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ५००, २० आणि १० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
कमलाकर जगताप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अश्विनी चव्हाण करत आहेत.